
सांगली, १४ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना आता महत्त्वपूर्ण अशा दोन सुविधांची भेट दिली आहे. सांगली मधील काळीखण आता नव्याने विकसित करण्यात आलेले करमणूक केंद्र आणि हनुमाननगर येथील आधुनिक भाजी मंडई यांचा आज शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता लोकार्पण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
मनोरंजनाचा नवा केंद्रबिंदूकाळीखण परिसरातील नागरिकांच्या मनोरंजन, विश्रांती आणि सामुदायिक उपक्रमांसाठी हे करमणूक केंद्र उभारण्यात आले आहे. येथे हिरवागार हरित परिसर, प्रशस्त बसण्याची व्यवस्था, खुल्या जागेतील मनोरंजन सुविधा आणि फाउंटेन व लेसर शो हे खास आकर्षण असणार आहे. स्वच्छतेचा नवा आदर्श विक्रेते आणि ग्राहक या दोघांच्याही सोयीसाठी हनुमाननगर भाजी मंडईचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या नव्या मंडईमध्ये प्रशस्त छत, स्वच्छ स्टॉल्स, सुरक्षितता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सुलभ प्रवेश-निर्गमनाचे मार्ग उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांना आरामदायी आणि सुरक्षित खरेदीचा अनुभव मिळणार आहे.
शहरातील सुविधा अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि नागरिककेंद्रित बनविणे हा महापालिकेचा संकल्प आहे. काळीखण करमणूक केंद्र आणि हनुमाननगर भाजी मंडई या सुविधा नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडवतील, याची आम्हाला खात्री आहे.
—-मनपा आयुक्त सत्यम गांधी —–