
मिरज, ता. १३ नोव्हेंबर : बुधवारी (ता. १२) रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मिरज शासकीय येथे निखिल कलगुटगी खून प्रकरणातील संसयित आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांच्यावर गावठी पिस्टल व कोयताने हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या ५ आरोपींच्या पोलिसांनी अवघ्या चार तासांत मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि कोयता यांसारखा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास मिरज शासकीय रुग्णालय येथे निखिल कलगुटगी खून प्रकरणातील संसयित आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचून काही संशयित आरोपी हॉस्पिटलमध्ये आले होते. पोलिसांची उपस्थिती आणि तत्परता लक्षात येताच या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या फिर्यादीनुसार, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संदिप गुरव आणि त्यांच्या पथकाने, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासांत पाच आरोपींना अटक केले . अटक केलेल्या संसयिंतांची नावे वंश दिनकर वाली (वय २०, रा. दत्त नगर, मिरज), समर्थ संजय गायकवाड (वय २१, रा. १०० फुटी रोड, मिरज), आकाश जगन्नाथ फोंडे (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, मिरज), वैभव राजाराम आवळे (वय २८, रा. १०० फुटी रोड, मिरज), सौरभ प्रसाद पोतदार (वय २३, रा. म्हाडा कॉलनी, मिरज) असे असून त्याच्याकडून ५०,००० रुपये किमतीचे १ गावठी पिस्तूल, ९०० रुपये किमतीची ३ जिवंत काडतुसे, २०० रुपये किमतीचा एक लाकडी कोयता आणि ५०० रुपयांचा एक मोबाईल फोन असा एकूण ५१, ६०० मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या आदेशान्वये, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे स.पो.नि. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप गुरव आणि त्यांच्या पथकाने, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मिरज शहरात एक मोठा अनर्थ टळला असून, सांगली पोलीस दलाच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.