
मिरज, १२ नोव्हेंबर : मिरज शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरात आज दुपारी एका थरारक घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. निखिल कलगुटगी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांच्यावर काहींनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात तैनात असलेल्या पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांना या हल्ल्याचा कट वेळीच लक्षात आला. हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी आणि पीएसआय दत्तात्रय पुजारी यांनी त्वरीत कारवाई करत एका संशयिताला जागीच पकडले. संशयिताला पकडताच त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. तसेच, घटनास्थळावरून एक कोयतादेखील सापडला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी गोळीबार करून आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून खुनाचा कट रचला होता. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपींचा हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडण्यात आला. तीन साथीदार पसार; शहरात खळबळ पोलिसांनी एका संशयिताला पकडले असले तरी, त्याचे अन्य तीन साथीदार मात्र घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे मिरज शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिलडा, निरीक्षक किरण चौगुले आणि सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालय परिसरात मोठा बंदोबस्त वाढवला असून, पसार झालेल्या आरोपींचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.