वाढदिवसाच्या रात्रीच दलित महासंघ अध्यक्षाचा निर्घृण खून; हल्लेखोरानेही गमावला जीव

सांगली, ता. १२ :  सांगली शहरात दलित महासंघ या संघटनेचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते (वय ४१, रा. गारपीर चौक, सांगली) यांचा मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून निघृण खून करण्यात आला. वाढदिवस साजरा करत असताना झालेल्या किरकोळ वादातून ही दुहेरी हत्याकांडाची घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 
     उत्तम मोहिते यांचा मंगळवारी ११ नोव्हेंबर  रोजी वाढदिवस होता. रात्री साडेअकराच्या सुमारास मोहिते त्यांच्या गारपीर चौकातील घराजवळ मित्र आणि समर्थकांसोबत वाढदिवस साजरा करत होते. याच वेळी संशयित शाहरुख उर्फ शेऱ्या शेख (वय ३०, रा. इंदिरानगर, सांगली) हा तेथे आला. यावेळी मोहिते आणि शेख यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर शाहरुख शेख याने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार केले. मोहिते यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या पोटावर आणि छातीवर वर्मी घाव बसले. वार इतके जोरदार होते की, त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली, तसेच पोटावर झालेल्या वारामुळे त्यांची आतडी बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे.

         हल्ला झाल्यानंतर उत्तम मोहिते जागेवरच कोसळले. हे पाहून वाढदिवसासाठी जमलेल्या समर्थकांनी आणि मित्रांनी तत्काळ शाहरुख शेख याला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत शेख गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र, मोहिते यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुसरीकडे, जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शाहरुख शेख याचाही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना रात्री उशिरा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नव्हता.  
    
 घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. 

उत्तम मोहिते यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि समर्थकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. खबरदारीचा उपाय म्हणून गारपीर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलीस ठाण्यात या दुहेरी हत्याकांडाची नोंद करण्याचे काम सुरू होते.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button