सांगलीत शुक्रवारी ‘उत्पादक-खरेदीदार’ संमेलन; १०० हून अधिक खरेदीदार उपस्थित राहणार

सांगली, १० नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला नवी, स्थिर आणि हमखास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘उत्पादक खरेदीदार संमेलनाचे’ (बायर-सेलर मीट) आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात १०० हून अधिक खरेदीदार सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

या संमेलनाचा मुख्य उद्देश शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध करणे हा आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभ घेता येईल, तसेच जिल्ह्यातील कृषी उद्योगाला आणि निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे. दीपायन बँक्वेट हॉल, जुने आरटीओ ऑफिस समोर, माधवनगर रोड, सांगली येथे शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५, सकाळी १० वाजता. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, या संमेलनामुळे सांगलीतील उत्पादित मालाला नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे. संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्यांपासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या उपसा जलसिंचन योजनांमुळे पूर्वीचा दुष्काळी भाग आता पूर्णपणे बागायत झाला आहे. पीक पद्धतीत बदल झाल्यामुळे सांगलीतून आता द्राक्ष, बेदाणा, डाळिंब आणि केळीसारख्या फळपिकांचे मोठे उत्पादन घेतले जात आहे. द्राक्ष आणि बेदाणा निर्यातीसाठी सांगली जिल्ह्याची विशेष ओळख आहे. या फळपिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे हे संमेलन शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button