
सांगली, १० नोव्हेंबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे नवीन दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ पासून MH 10 EU (एम एच १० ई यू) ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
ज्या वाहनधारकांना MH 10 EU या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक हवा असेल, त्यांना तिप्पट शुल्क (Fee) भरून तो क्रमांक प्राप्त करता येईल. आकर्षक क्रमांकांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर वितरण केले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. पसंतीचे नोंदणी क्रमांक ‘वाहन ४.०’ या संगणकीय प्रणालीवर दिले जातील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये विहित केलेल्या पुराव्यांची साक्षांकित प्रत (उदा. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड) तसेच ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DD) सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट जो अर्जदार सादर करेल, त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांक मिळवलेल्या अर्जदारांना १८० दिवसांच्या आत वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक असेल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी स्पष्ट केले आहे.