
सांगली, ता. १० : किरकोळ वादातून आणि अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून सांगलीमध्ये एका मित्राचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे (वय ३३, रा. हनुमाननगर) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या दोन मित्रांनी एडक्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात वार करून त्याची हत्या केली. ही घटना रविवार (काल) मध्यरात्रीनंतर आपटा पोलिस चौकीसमोरील जमील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात घडली. मृत अमीर कन्नुरे हा गेल्या पाच-सहा वर्षांपासून याच तबेल्यात झोपायला असायचा आणि किरकोळ कामे करत होता. अमीरला दारूचे व्यसन होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर आणि त्याचे मित्र मलिक ऊर्फ मलक्या दस्तगीर मुलाणी (वय २८, रा. वखारभाग) आणि निशांत भिमसेन दासुद (वय २०, रा. काळीखण) हे तिघेही दारूचे व्यसनी होते आणि अनेकदा एकत्र दारू पित होते. रविवारी सायंकाळी तिघे एकत्र असताना अमीरने मलिक आणि निशांत यांना अश्लील शिवीगाळ केली होती. याचा राग दोघा मित्रांच्या मनात होता. याच रागातून त्यांनी अमीरचा काटा काढण्याचा कट रचला. रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला. तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा लघुशंकेसाठी बाहेर गेला असताना, दबा धरून बसलेले संशयित मलिक आणि निशांत यांनी तबेल्यात प्रवेश केला.
अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता. संधी मिळताच दोघांनी अमीरच्या तोंडावर, डोक्यावर, नाकावर आणि हनुवटीवर एडक्यासारख्या धारदार हत्याराने सलग सात वार केले आणि तेथून पळ काढला. लघुशंकेहून परतत असताना नितीन जाधव याला दोघे जण पळून जाताना दिसले. त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो आरोपी दुचाकी सोडून पळून गेला. नितीनने त्वरित तबेल्यात जाऊन पाहिले असता, अमीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने तातडीने तबेल्याचे मालक कुरणे यांना माहिती दिली. जखमी अमीरला तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र स्ट्रेचरवरून खाली उतरवत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांना संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपअधीक्षक गिल्डा यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून मलिक याला घरातून, तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉल परिसरातून ताब्यात घेतले. दोघांनीही खुनाची कबुली दिली असून, विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.