

नवी दिल्ली, ता.१० : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज (सोमवार) मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या भीषण घटनेत आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दिल्लीसह मुंबई आणि देशातील प्रमुख शहरांमध्ये तातडीने ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पार्किंगमधील कारमध्ये स्फोटलाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरातील अनेक इमारतींना धक्का बसला. सुरुवातीला हा अपघात किंवा सिलेंडरचा स्फोट असल्याचा संशय होता, परंतु घटनेचे स्वरूप गंभीर असल्याचे समोर आले आहे. स्फोट झालेले ठिकाण लाल किल्ल्यापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ संपूर्ण परिसर रिकामा केला. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे.सुरक्षा यंत्रणा अलर्टवरदिल्ली पोलिसांसोबतच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. फॉरेन्सिक टीमद्वारे स्फोटाचे नेमके कारण आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.गेल्या चार दिवसांत, म्हणजे ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान दिल्लीमध्ये काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या स्फोटाकडे सुरक्षा यंत्रणा गांभीर्याने पाहत आहेत आणि याचा तपास दहशतवादी हल्ल्याच्या दिशेनेही केला जात आहे.
मुंबईसह देशात ‘हाय अलर्ट’दिल्लीतील या घटनेनंतर संपूर्ण राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचसोबत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देण्यात आल्या असून, शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित व्यक्तींची यादृच्छिक झडती घेतली जाईल. ग्राऊंड इंटेलिजन्स नेटवर्क सक्रिय करण्यात आले असून संवेदनशील भागातील गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.