
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तासगावजवळ थरार; विजेत्यांना फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टरसह लाखो रुपयांची बक्षिसे
सांगली, दि. ०९ नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील तासगाव-बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथे, पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन ५०० एकर मैदानावर करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा गौरव करणाऱ्या या ‘श्रीनाथ केसरी’ स्पर्धेचा समारोप उपमुख्यंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या थरारक शर्यतीमध्ये ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेकफेल’ या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत श्रीनाथ केसरीचा बहुमान मिळवला. या जोडीने दमदार कामगिरी करत फॉर्च्यूनर गाडी जिंकली. तसेच, लखन आणि सर्जा या बैलजोडीने दुसरी फॉर्च्यूनर गाडी जिंकण्याचा मान मिळवला.
१०० कोटींहून अधिकची उलाढाल; ‘बीएमडब्ल्यू’ बक्षीस जाहीरया स्पर्धेत फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर आणि दीडशेहून अधिक दुचाकी (बुलेट) यांसारख्या आकर्षक बक्षिसांसाठी हजारो बैलगाड्या धावल्या. लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकिनांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. या आयोजनातून ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल झाली.
शर्यतीचा समारोप होताच, आयोजक पैलवान चंद्रहार पाटील यांनी पुढील शर्यतीची घोषणा केली. या स्पर्धेतील सर्वात मोठे बक्षीस ‘बीएमडब्ल्यू’ गाडी असणार असल्याचे जाहीर केले, ज्यामुळे बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते. शेतकरी आपल्या बैलाला जिवापाड जपतो, आणि गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.”ते म्हणाले की, न्यायालयाने बंदी घातल्यानंतर हा आपला सांस्कृतिक ठेवा पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न केले, ज्यामुळे ही स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकली.”गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या शर्यतीच्या आयोजनातून गोवंशाचे जतन करण्याचे काम होत आहे,” असे त्यांनी सांगितले.पैलवान चंद्रहार पाटलांच्या पुढाकाराने पैलवानांच्या तालमींना ताकद देण्यासह, बैलगाड्यांबाबतचे अनेक प्रश्न मार्गी लावायचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या भव्य बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांसाठी विशेष बक्षीस वितरण सोहळा लवकरच मुंबई मंत्रालयासमोर होणार असल्याचे पै. चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले. मा. शिंदे साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाला आधुनिक ओळख देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.