योगेवाडीत ‘श्रीनाथ केसरी’ बैलगाडा शर्यत उत्साहात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

बैलगाडा शर्यत केवळ परंपरा नाही, गोमातेचा सन्मान – उपमुख्यमंत्री शिंदे

तासगाव, दि. ०९ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : तासगाव तालुक्यातील योगेवाडी (जि. सांगली) येथे ‘डबल महाराष्ट्र केसरी’ पैलवान चंद्रहार पाटील यांच्या वतीने आयोजित ‘श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत’ आणि ‘शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन’ हा महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि गोधनाच्या गौरवाचा अद्वितीय सोहळा आज (दिनांक ९ नोव्हेंबर २०२५) प्रचंड उत्साहात पार पडला.

या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देशभरातून तब्बल ५ लाखांहून अधिक शेतकरी बांधवांनी या भव्य स्पर्धेसाठी हजेरी लावत महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील श्रद्धेचे दर्शन घडवले.

“ही केवळ बैलगाडा शर्यत नसून गोमातेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्सव आहे. गोमातेला ‘राज्यमातेचा दर्जा’ देऊन महायुती सरकारने परंपरा आणि श्रद्धेचा मान राखला आहे. “या शर्यतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून, १०० कोटींहून अधिकची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. भविष्यात ही स्पर्धा ‘प्रो-कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो-बैलगाडा’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला स्पर्धकांचा गौरव आणि गोमातेचे वाटप:

या शर्यतीचे एक खास वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे महिला स्पर्धकांचा सक्रिय सहभाग आणि त्यांचा सन्मान. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते १०० भगिनींना गाईंचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे या पारंपरिक वारशात महिलांच्या योगदानाचा गौरव झाला.

स्पर्धेतील विजेत्यांना थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर आणि १५० टू-व्हीलर अशा अनेक सन्मानचिन्हांद्वारे गौरवण्यात आले. या विजेत्यांचा लवकरच मंत्रालय, मुंबई येथे विशेष बक्षीस समारंभात सत्कार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाला आधुनिक ओळख देणारा ठरला असून, आयोजक पैलवान चंद्रहार पाटील आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

या सोहळ्याला ना. उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, तसेच बैलगाडा मालक, चालक, शर्यत प्रेमी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button