
एकाच दिवसात मिरज रोड परिसरातून तब्बल १७ टन कचरा उचलला

सांगली, दि. ०८ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेचा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आज (ता.०८) रोजी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार एक भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे मिरज रोड परिसर अक्षरशः चकाकला असून, एकाच दिवसात तब्बल १७ टन कचरा गोळा करण्यात आला.
सांगली येथील राम मंदिर चौक ते मिरज गांधी चौक या मिरज रोडवरील संपूर्ण परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) सौ. स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य विभागाचे २०० हून अधिक कर्मचारी या ‘माझे शहर, स्वच्छ शहर’ अभियानात सहभागी झाले होते.
कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवरील, फुटपाथवरील तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील मोठ्या प्रमाणात कचरा मनोभावे गोळा केला. दिवसभरात या परिसरातून सुमारे १७ टन (Tons) इतका विक्रमी कचरा उचलण्यात आला. या व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे मिरज रोड परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर झाला असून, शहर स्वच्छतेचा एक नवा आणि प्रभावी आदर्श स्थापित करण्यात महापालिका यशस्वी झाली आहे.

शहरातील ही स्वच्छता कायमस्वरूपी टिकून राहावी यासाठी महापालिकेने नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. “शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘माझे शहर, स्वच्छ शहर’ या अभियानात आपली जबाबदारी ओळखून सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.