शेडजी मोहिते यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या कुपवाडमधील वारकरी स्टॅच्यूचे लोकार्पण

‘ईव्हीएममुळे भपकेबाज पक्ष सत्तेत’ – जयंत पाटील यांची टीका

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक; मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन

कुपवाड, ता. ८ नोव्हेंबर : कुपवाड शहरवासीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या ‘वारकरी संप्रदाय स्टॅच्यू’ (पुतळा) चा भव्य लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. ६) रात्री माजी मंत्री तथा आमदार जयंतरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील संत रोहिदास महाराज चौक तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील मुख्य रस्त्यावर हे वारकऱ्यांचे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायाच्या कार्याला आणि सांस्कृतिक मूल्यांना उजाळा देणारा हा उपक्रम शहरवासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. निष्पक्ष निवडणुकीची मागणी या सोहळ्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सामाजिक योगदानावर भाष्य करतानाच, देशातील सद्यस्थितीवर थेट राजकीय टीका केली. आमदार पाटील म्हणाले, “देशातील निवडणुका पारदर्शकपणे होणे अत्यंत आवश्यक आहे. जर निवडणुका निष्पक्ष झाल्या नाहीत, तर देशातील संविधान (घटना) आणि लोकशाही टिकणे अवघड होईल.

सत्तेत असलेल्या पक्षावर टीका

“सध्या देशात जो भपकेबाज पक्ष सत्तेत आहे, त्यांच्या कार्यक्रमांचा दिखावा सर्वांनाच दिसत आहे. हा पक्ष मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास घाबरत असून, मतदान प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण करून सत्तेवर कायम राहण्याचा प्रयत्न करत आहे.”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला आहे. मात्र, हरियाणातील एका नटीच्या नावावर दोनशे मते नोंदविली गेल्याचे उदाहरण समोर आले आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे, असे गंभीर भाष्य त्यांनी यावेळी केले.मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी मतदारांना जागृत राहण्याचे आवाहन केले. “मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे का, याची खात्री करून घ्या. ठराविक समाजाची नावे यादीतून वगळली जाऊ नयेत, यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. निवडणूक आयोगावर टीका झाल्यावर सत्ताधारी पक्ष बचावासाठी पुढे येतो, ज्यामुळे त्यांचे षडयंत्र लोकांसमोर स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

महापालिका निवडणुकीबद्दल विश्वासयावेळी त्यांनी महापालिका निवडणुकांबद्दलही भाष्य केले. “महापालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पुरोगामी विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करावी आणि पुन्हा सत्तेत यावे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या भव्य सोहळ्याला माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक धनपाल खोत, शेडजी मोहिते, सविता मोहिते, मुश्ताकअली रंगरेज, कुमार पाटील, हरिदास पाटील, शेखर माने, किरण सूर्यवंशी, तानाजी गडदे, सचिन जगदाळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button