
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित प्रकरणांवर चर्चा
सांगली, दि. ०७ नोव्हेंबर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, १९८९ (Atrocities Act) अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात संपन्न झाली. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला.
विशेषतः पोलीस विभागाकडे, तसेच समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या तक्रारी आणि प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यासोबतच जातीच्या दाखल्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचाही यात समावेश होता. प्रलंबित प्रकरणांवर जलद कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या. समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम यांनी मागील इतिवृत्त आणि पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणांसह सध्याच्या स्थितीचा आढावा समितीसमोर सादर केला.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नागरी हक्क संरक्षण पथकाच्या एस. व्ही. वागलगावे, समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आदी अधिकारी उपस्थित होते.