सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे निर्देश: “नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडा

“आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे यंत्रणांना आदेश

सांगली, ता. ०७ नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील ६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यामुळे संबंधित क्षेत्रात तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी संबंधित यंत्रणांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत, निःपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहिता व कायदा-सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी त्यांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर देण्यास सांगितले. जिल्ह्यातील नगरपरिषदा (आष्टा, उरुण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा) आणि नगरपंचायती (आटपाडी व शिराळा) या क्षेत्रांमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, श्रीनिवास अर्जुन यांच्यासह सहआयुक्त, नगर प्रशासन दत्तात्रय लांघी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर तसेच पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नगरपरिषद/नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी काकडे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. निवडणूक शांततेत आणि नियमांनुसार पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button