
वंटमुरे कॉर्नर रस्ता होणार कॉंक्रिटचा; स्फूर्ती चौक रोडवरील ड्रेनेज काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; गुणवत्ता व वेळेवर भर
सांगली, ता.८ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी आज अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रलंबित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत कामांची गती व गुणवत्ता तपासली. रस्त्यांची दुरुस्ती, पावसाळी पाण्याचा निचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेचा सखोल आढावा घेऊन, गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याचे कठोर निर्देश त्यांनी संबंधित अभियंते व कंत्राटदारांना दिले.
प्रमुख रस्त्यांवरील कामांचा आढावा
१. वंटमुरे कॉर्नर रोड, मिरज:हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून वारंवार खराब होत असल्याने, प्रशासनाने तो कॉंक्रिट करण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
आयुक्तांचे निर्देश:
रस्त्याचे काम केवळ तांत्रिक निकषांनुसार व दर्जेदार पद्धतीनेच पूर्ण व्हावे, तसेच पावसाळी पाणी व सांडपाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन आधीच करण्याच्या सूचना कंत्राटदारास देण्यात आल्या.
२. स्फूर्ती चौक ते वृंदावन व्हिला रस्ता:दीर्घकाळापासून खराब असलेल्या या रस्त्याच्या ठिकाणी ड्रेनेजचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना निर्देश देण्यात आले.ड्रेनेजचे काम संपताच डांबरीकरणाचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश बांधकाम (इमारत व रस्ते) विभागाला देण्यात आले.
३. लक्ष्मी मंदिर ते भारत सूतगिरणी रस्ता:या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असून, ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर MIDC परिसराकडे जाणारी मुख्य पाणीपुरवठा वाहिनी देखील प्रलंबित होती.
आयुक्त सत्यम गांधी यांनी ड्रेनेज आणि पाणीपुरवठा वाहिनी ही दोन्ही कामे तात्काळ व समन्वयातून पूर्ण करण्याचे आदेश दिले.
“महानगरपालिकेच्या सर्व विकासकामांमध्ये दर्जा, गती आणि पारदर्शकता या तिन्ही गोष्टींवर भर असला पाहिजे. नागरिकांना दैनंदिन जीवनात दिलासा देणारी ही कामे वेळेत पूर्ण करणे हीच खरी जबाबदारी आहे. यात कसूर खपवून घेतली जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ————आयुक्त सत्यम गांधी————
या पाहणीवेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा व जलनिःसारण) चिदानंद कुरणे, उप अभियंता (इमारत व रस्ते) महेश मदने, शाखा अभियंते. अशोक कुंभार, डी. डी. पवार तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.