
सांगली, ता.०७ नोव्हेंबर : दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे सांगली शहरात होणारे नुकसान आणि वाहतुकीतील अडथळे कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या माध्यमातून कर्नाळ रोड रुंदीकरण व उंचीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी पुलालगत असलेली मुख्य पाणीपुरवठा लाईन शिफ्ट करण्याचे काम सध्या महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे. या कामाची प्रगती पाहण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.
कर्नाळ रोडवरील शहरी नाला पूल महापुराच्या काळात पाण्याखाली जातो, परिणामी शहरातील वाहतूक ठप्प होते. ही समस्या दूर करण्यासाठी पुलाची उंची वाढवून तसेच रस्त्याचे रुंदीकरण आणि उंचीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांची सुरक्षितता वाढेल आणि वाहतूक सुरळीत राहील, असा प्रशासनाचा हेतू आहे. कामाची सद्यस्थिती पुलालगत असलेली मुख्य पाणीपुरवठा लाईन शिफ्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे. या लाईन शिफ्टिंगसाठी पुलाजवळ ‘चेअर ब्रिज’ (Chair Bridge) बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आयुक्तांचे निर्देश —
“गुणवत्तेशी तडजोड नाही; पाणीपुरवठा सुरळीत ठेवा”पाहणीदरम्यान आयुक्त . गांधी यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे तसेच निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
त्यांनी पाणीपुरवठा विभागाला विशेष सूचना देताना सांगितले
“लाईन शिफ्ट करत असतानाही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहील, याची काळजीपूर्वक योजना करावी.”या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केल,
यावेळी कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) चिदानंद कुरणे, उप अभियंता अमीर हमजा मुलाणी, रोहित लोखंडे तसेच संबंधित मक्तेदार पाटील उपस्थित होते.