
सांगली, ६ नोव्हेंबर : ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपल्या निर्भीड लेखणीतून प्रभावीपणे मांडणारे पत्रकार सदाशिव पुकळे यांना प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन २०१४ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदाशिव पुकळे यांनी आपल्या कारकिर्दीत विविध विषयांवर अत्यंत महत्त्वपूर्ण वृत्त संकलन केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि स्थानिक समस्यांना वाचा फोडण्याच्या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना यापूर्वीही अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे.
पुकळे यांच्या या उत्कृष्ट कामाची दखल घेत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड यांच्या वतीने त्यांना ‘बेस्ट प्रेस रिपोर्टर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया जयकुमार गोरे आणि साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई मोटे यांच्या हस्ते सदाशिव पुकळे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, यात हनुमंत मोटे, बाळासो मोठे, लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील, गणेश पाटील यांचा समावेश होता.
पुरस्कारानंतर अभिनंदनाचा वर्षाव हा पुरस्कार मिळाल्यानंतर लगेचच अनेक प्रमुख नेत्यांनी आणि सहकाऱ्यांनी पुकळे यांचे अभिनंदन केले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जयवंत सरगर, चंद्रकांत पावणे, संदीप पावणे, मोहन खरजे, नाना मोटे, विवेक पावणे, आण्णा मोटे, सुखदेव पाटील, आणि सुखदेव खताळ यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
सदाशिव पुकळे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.