
सांगली/मिरज, ६ नोव्हेंबर (क्रीडा प्रतिनिधी) : आगामी ‘SMKC प्रीमियर लीग २०२५’ या भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट लीग स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्यांच्या आकर्षक चषकाचे आज (दि. ५ नोव्हेंबर) अनावरण करण्यात आले. हा उत्साहपूर्ण सोहळा मिरज येथील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) मा. प्रणील गिल्डा साहेब यांच्या शुभ हस्ते या भव्य चषकाचे अनावरण करण्यात आले.
स्पर्धेचे मोठे आकर्षण असलेल्या या चषकाच्या अनावरणानंतर बोलताना डीवायएसपी गिल्डा यांनी आयोजन समितीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी खेळाडूंना शिस्तबद्ध आणि खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजन समितीचे सदस्य, सहभागी संघाचे प्रतिनिधी आणि परिसरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अनावरण सोहळ्यामुळे १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा उत्साह द्विगुणित झाला आहे.