
‘प्रलंबित कामांची माहिती नाही’ — आढावा बैठकीत निष्काळजीपणा आढळल्याने दोन शाखा अभियंते निलंबित, दोन अधीक्षकांची वेतनवाढ रोखली
सांगली, ता.५: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या अंतर्गत बांधकाम विभागातील दोन शाखा अभियंते तात्काळ निलंबित करण्यात आले असून, नगररचना व बांधकाम विभागातील दोन अधीक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
आढावा बैठकीत उघड झालेली गंभीर त्रुटी
सोमवार, ०३ ऑक्टोबर २०२५, रोजी कै. राजाभाऊ जगदाळे सभागृहात विभागप्रमुख व अधीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालयातील संदर्भ, KRA–KPA, GRC तसेच विधानसभा प्रश्नांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीदरम्यान,
- संबंधित अधीक्षकांना त्यांच्या विभागातील प्रलंबित कामांची माहिती नव्हती.
- विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
- त्यांना कर्तव्यांची जाणीव नसल्याचे व प्रशासकीय जबाबदारीत हलगर्जीपणा केल्याचे आढळले.
“अधीक्षक हा कार्यालयाचा केंद्रबिंदू असून, त्याने प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करणे अपेक्षित आहे,” असे निरीक्षण आयुक्तांनी नोंदवले.
शिस्तभंगाची कारवाई
आयुक्त गांधी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियम ३(१)(२) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार ही कारवाई केली आहे. शाखा अभियंते श्रीमती पंकजा अरविंद रुईकर व आलम अजीज अत्तार यांनी कार्यपद्धतीनुसार (SOP) काम न करणे, विनापरवाना गैरहजर राहणे, तसेच वरिष्ठांच्या सूचनेशिवाय कार्यात ढिलाई केल्याचे उपअभियंत्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यांचे कामकाज असमाधानकारक ठरल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. दोन अधिकारी | अधीक्षक | नगररचना व बांधकाम | वेतनवाढ रोखली आहे.
“नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रशासकीय शिस्त राखणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.”
महापालिका आयुक्त सत्यम गांधी