सांगली : सांगलीमध्ये आज दि 8 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील सांगलीत येत आहेत.

मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सांगलीत होणाऱ्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झालेली आहे. सांगली शहरामध्ये 40 वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह 500 कर्मचार्यांचा फौजफाटांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

विश्रामबाग चौक ते राममंदिर चौक या रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. शहरात येणार्या व जाणार्या वाहनासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील आज दि 8 ऑगस्ट रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विश्रामबाग चौकातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत हजारोच्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत. जरांगे पाटील यांचे दुपारी विश्रामबाग चौकात आगमन होईल. तर सायंकाळी राममंदिर चौकात सभा होणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी शहरातील सर्व मार्गावर बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली शहरचे उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव, मिरजेचे प्रनिल गिल्डा यांच्यासह चार उपअधिक्षक, 15 पोलिस निरीक्षक आणि 500 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत.
शहरातील प्रवेश मार्ग
शांतता रॅलीसाठी शहरात येणार्यासाठी प्रवेश मार्ग निश्चित केले आहेत. मिरजेकडून विजयनगर, आलदार चौकपर्यंत, कोल्हापूरकडून इनामधामणी रोड, टी जक्शंनपर्यंत, इस्लामपूरहून कॉलेज कॉर्नर, सांगलीवाडी, विटा, तासगावकडून अहिल्यादेवी होळकर चौक, लक्ष्मी मंदिर चौक तर पलूसकडून येण्याकारिता बायपास रोड, कॉलेज कार्नरपर्यंत रस्ता खुला ठेवला आहे.
सांगली-मिरज रोड 12 तास बंद
सांगली-मिरज रस्त्यावरील विश्रामबाग चौक ते राममंदिर चौक या मार्गावरून शांतता रॅली निघणार आहे. हा संपूर्ण रस्ता बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावर वाहनांना दिवसभरासाठी प्रवेशबंदी घातली आहे. मुख्य रस्त्यावर येणारे सर्व उपरस्ते, गल्ली, बोळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था
रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मिरजेकडून सांगलीकडे येणार्या अवजड वाहनांना गांधी चौक, मिरज एमआयडीसी, कुपवाड एमआयडीसी, लक्ष्मीमंदिर, शिंदे मळा, टिंबर एरिया, कॉलेज कार्नरमार्गे येता-जाता येईल. इतर वाहनांना कृपामाईजवळील हनुमानमंदिरमार्गे भारत सुतगिरणी, लक्ष्मी मंदिर, शिंदे मळा, टिंबर एरियामार्गे शहरात येता येणार आहे. मिरजेकडून कोल्हापूर रोडकडे जाण्यासाठी आलदार चौकातून शंभरफुटी रोडमार्गे वाहतूक करता येईल. तासगाव-विट्यावरून येणार्या वाहनांसाठी संजयनगर, अहिल्यादेवी होळकरच ौक, टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर, आमराई, वखारभाग, राजवाडा चौक तर पलूसकडून येणार्या वाहनासाठी बायपास रोड, कॉलेज कॉर्नर, आमराई, वखारभाग, पटेल चौक, राजवाडा मार्गे शहरात येता-जाता येईल.
वाहनासाठी पार्किंग व्यवस्था
कोल्हापूर रोड: आदिसागर मंगल कार्यालय, कल्पद्रुम क्रीडांगण नेमीनाथनगर, शास्त्री चौक, दामाणी हायस्कूल मैदान
मिरज रोड: विश्रामबाग रेल्वे स्टेशन आयटी पार्क, चिंतामण कॉलेज मैदान, विलिंग्डन, वालचंद कॉलेज, कांतीलाल शहा प्रशाला, कृषी कॉलेज.
तासगाव, विटा, जत : चिन्मय पार्क रस्ता, वसंतदादा कुस्ती केंद्र, नवमहाराष्ट्र हायस्कूल, लक्ष्मीनगर, पोदार स्कूलजवळ, सह्याद्रीनगर महापालिका शाळा 22, उद्योग भवनजवळ, कुपवाड फाटा कॉर्नर, मार्केट यार्डातील रस्ते.
इस्लामपूर, पलूस:डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, तात्यासाहेब मळा, वखारभाग ते ईदगाह मैदान रस्ता, सर्कीट हाऊस ते मल्टिप्लेक्स रस्ता, सांगलीवाडी चिंचबाग, वैरण बाजार, भावे नाट्यगृह, गणपती पेठेतील रस्ता.
शांतता रॅली व सभेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सामील होण्याची शक्यता आहे. कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरिकांच्या जीवीतास धोका होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन, पालिकेची स्वच्छता वाहनाखेरीज सर्व वाहनांना मनाई आदेश लागू केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 प्रमाणे कारवाई केली जाईल-संदीप घुगे पोलिस अधिक्षक .