पलूस. ता. ४: पलूस नगरपरिषदेच्या नव्या, आधुनिक आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. आमदार विश्वजित कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या निधीला मंजुरी मिळाली असून, यामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याबरोबरच नागरिकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. या निधीमुळे पलूस नगरपरिषदेला एक आधुनिक आणि नागरिकाभिमुख कार्यालयीन वास्तू उभी करता येणार आहे.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पलूस शहरासाठी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेच्या पाणीपूजन कार्यक्रमावेळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा शब्द पलूसवासीयांना देण्यात आला होता. आज या शब्दाची पूर्तता झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. –
—-आमदार विश्वजीत कदम—–
नव्या इमारतीच्या माध्यमातून नागरिकांना सर्व शासकीय सेवा अधिक वेगाने, सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे नगरपरिषदेच्या कामकाजालाही वेग येणार असून, शहराच्या विकासात हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.