किमान आधारभूत किंमत योजना: खरीप पिकांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

सांगली, ता. ४: खरीप पणन हंगाम २०२५-२६ करिता केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची खरेदी केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ‘एनईएमएल’ (NemL) या शासकीय पोर्टलवर ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मुंबई) आणि नाफेड (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ही खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.

शासनाने निश्चित केलेले दर (प्रति क्विंटल):
सोयाबीन: ५३२८ रुपये
मूग: ८७६८ रुपये
उडीद: ७८०० रुपये
राज्यात या पिकांच्या खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे. प्रत्यक्ष खरेदीला १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात करण्यात येईल.

सांगली जिल्ह्यातील मंजूर खरेदी केंद्रे:
सांगली जिल्ह्यात सध्या सोयाबीन खरेदीसाठी खालील दोन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे:

१. विष्णुआण्णा खरेदी विक्री संघ, सांगली (केंद्र: सांगली)
२. ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, तासगाव (केंद्र: तासगाव)

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

नोंदणी करताना शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे:
चालू हंगाम (२०२५-२६) मधील सोयाबीन पीकपेऱ्याची ऑनलाईन नोंद असलेला ७/१२ उतारा. आधार कार्डची छायांकित प्रत (झेरॉक्स). बँक पासबुकची प्रत.

नोंदणी व खरेदी प्रक्रिया:
शासनाने चांगल्या प्रतीच्या (FAQ) सोयाबीनसाठी ५३२८ रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर, पात्र शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी कधी आणायचा, याबाबत एसएमएस (SMS) द्वारे सूचना दिली जाईल. सूचना प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रावर घेऊन यावा.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button