शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडूंनी देशाचे नाव उंचावावे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या कामगिरीचा दिला आदर

सांगली, दि.३ नोव्हेंबर : सांगली येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे थाटात झाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी खेळाडूंनी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत जिद्दीने उत्कृष्ट कामगिरी करावी आणि जगभरात देशाचे व महाराष्ट्राचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या मैदानावर या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या उद्‌घाटन समारंभाला खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माजी तालुका क्रीडा अधिकारी उमेश बडवे, महाविद्यालयाचे रितेश शेठ, प्रकाश शाह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वर्षांखालील मुलींच्या वयोगटासाठी ही स्पर्धा ४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे आणि विशेषत: या संघात सहभागी असलेल्या सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे अभिनंदन केले. तसेच, राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि चांगल्या आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले.

“क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे पाच टक्के आरक्षण मिळते हे खरे असले तरी, क्रीडांगणावर आपण घडतो. त्यामुळे खेळाची मजा घेण्यासाठी स्पर्धा असते. हीच खरी क्रीडा संस्कृती आहे,” असे मत व्यक्त केले. स्पर्धा करा, पण संकटावेळी इतरांना मदतीचा हात देणाराच खरा यशस्वी खेळाडू असतो, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी,

खासदार विशाल पाटील यांनी खेळाडूंना संघभावनेने खेळून स्पर्धेचा आनंद घेण्याचे आणि यश-अपयशाच्या पलिकडे जाऊन खिलाडू वृत्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या श्रिया घोटसकर (पुणे) व मनवा पाटील (इस्लामपूर) यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मैदानपूजन करण्यात आले, तसेच खेळाडूंना शपथ देण्यात आली. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच मोहसिन बागवान (पुणे) हे पंचप्रमुख असून, रोहित झुरांगे (पुणे), प्रवीण मोरबाळे, इब्राहिम शेख, रोहित ढेरे आणि अमोल पालकर (सर्व कोल्हापूर) हे पंच म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यातील आठ विभागांचे आठ संघ, निवड चाचणीसाठीचे खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक, पंच, निवड समिती सदस्य, स्वयंसेवक अशा जवळपास १९७ व्यक्तींचा या स्पर्धेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे. त्यांच्या भोजन, निवास व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था संयोजकांनी केली आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button