– 12 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय याद्या होणार प्रसिद्ध

सांगली, दि.३ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम मतदार यादी संबंधित तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली होती आणि कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला होता.
त्यानुसार, निवडणूक विभाग (जिल्हा परिषद) आणि निर्वाचक गण (पंचायत समिती) यांच्यासाठीची छापील अंतिम मतदार यादी ३ नोव्हेंबर २०२५ पासून संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी ठेवण्यात आली आहे. नागरिक आपल्या भागातील मतदार यादीची पाहणी तहसील कार्यालयात करू शकतात. उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी पुढे कळवले आहे की, निवडणुकीसाठी अत्यंत आवश्यक असलेली मतदान केंद्रांची यादी आणि मतदार केंद्रनिहाय मतदार यादी (मतदान केंद्रांच्या पत्त्यांसह) लवकरच, म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल.