– नोव्हेंबर २०२५ मध्ये पुढील बैठक, अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, ता.३ : सांगली शहर येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ८८ प्रकरणांवर विचार करण्यात आला, त्यापैकी ६२ प्रकरणे मंजूर करून लाभार्थींना दिलासा मिळाला आहे. तहसिलदार तथा संजय गांधी योजना सांगली शहर अध्यक्ष शुभांगी कनवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील संजय गांधी शाखेत नुकतीच पार पडली. या बैठकीत ‘संजय गांधी निराधार योजने’अंतर्गत दाखल झालेल्या ५८ प्रकरणांपैकी ३८ अर्ज पात्र ठरले, तर २० अर्ज अपात्र ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे, ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने’च्या एकूण ३० प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. यातील २४ अर्ज पात्र ठरले असून, ०६ अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. अशा प्रकारे दोन्ही योजना मिळून एकूण ८८ पैकी ६२ प्रकरणे पात्र ठरली आहेत. या बैठकीला महसूल सहायक संदीप पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये योजनेची पुढील बैठक होणार आहे. त्यामुळे योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व संबंधित नागरिकांनी वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.