
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही – मंत्री प्रताप सरनाई
मुंबई, ता.१: महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेला अधिक सुरक्षित आणि जबाबदार बनवण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन, सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याने तातडीने कारवाई करत ७ मद्यपी कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे.
“एसटी दररोज लाखो सर्वसामान्य नागरिकांची सेवा करते. प्रवाशांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. मद्यपान करून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला एसटीत थारा नाही. त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्यात येईल.”
मंत्री प्रताप सरनाईक
राज्यभरात अचानक तपासणी मोहीम
मंत्र्यांच्या आदेशानुसार, एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता खात्याने दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कार्यरत चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबविली. या अचानक तपासणीमुळे महामंडळात एकच खळबळ उडाली होती. या व्यापक मोहिमेत संशयास्पद वाटणाऱ्या एकूण १७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, ज्यात ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
७ कर्मचारी दोषी, निलंबनाची कारवाई
या तपासणी मोहिमेदरम्यान, कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याचे आढळून आलेल्या एकूण ७ कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले असून, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये १ चालक आणि ४ यांत्रिक कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विभागनिहाय कारवाईचा तपशील:
धुळे विभाग: एक यांत्रिक कर्मचारी, एक स्वच्छक आणि एक चालक मद्यपान करताना आढळले.
नाशिक विभाग: तपासणीत एक चालक दोषी आढळला. परभणी आणि भंडारा विभाग: प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी मद्याच्या अमलाखाली काम करताना आढळला. नांदेड विभाग: तपासणीत एक वाहक मद्यपान केलेला आढळला.
कठोर कारवाईचा इशारा आणि ब्रेथ अॅनालिसिस यंत्रणा
प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे हा गंभीर गुन्हा असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. सुरक्षा आणि दक्षता खात्याने भविष्यात अशा प्रकारची अचानक आणि वारंवार तपासणी मोहीम संपूर्ण महामंडळात राबविण्यात येईल, असा सज्जड दम दिला आहे.
प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता असून, भविष्यात नवीन खरेदी करण्यात येणाऱ्या बसेसमध्ये चालकाच्या समोर ‘ब्रेथ अॅनालिसिस यंत्र’ (अल्कोहोल तपासणीसाठी) बसविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मद्यपी चालकांना त्वरित अटकाव करणे शक्य होणार आहे.
महामंडळाच्या या कठोर भूमिकेचे आणि सुरक्षितता उपाययोजनांचे जनतेने स्वागत केले असून, यामुळे प्रवासादरम्यान अधिक सुरक्षितता अनुभवता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.