ऊस दर: कारखानदारांची ३४५० ची पहिली उचल अमान्य; राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना ‘भूमिगत’ होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश

मुख्यमंत्री ५ नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर; त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन

सांगली, ता. १: सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक सीमाभागात ऊस दराच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येऊन पहिली उचल म्हणून प्रतिटन ₹३४०० ते ₹३४५० पर्यंत दर देत आहेत, परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ही उचल पूर्णपणे अमान्य केली आहे. ऊस परिषदेत मागणी केलेल्या ₹३७५१ या दराबाबत तोडगा न निघाल्यास कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी, असे थेट आदेश त्यांनी दिले आहेत.

सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप: ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकार आणि कारखानदार या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. (FRP) जाहीर केली आहे.

या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी  सर्व शेतकरी संघटना, कारखानदार आणि प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली आहे.या शिवाय, हंगामाच्या सुरुवातीलाच कारखानदारांकडून संघटनेच्या कार्यकर्त्यांना गुंडांच्या मदतीने मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोपही शेट्टी यांनी केला आहे. ऊसाला चांगला भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे आणि आंदोलनाची धार वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त आंदोलनाची तयारी: प्रशासन आणि राज्य सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत शेट्टी यांनी माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची जोरदार तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, ७ नोव्हेंबर रोजी निगवे (ता. करवीर) येथून पुढील आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button