महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक कारवाई; ‘दहशत माजविण्याच्या’ उद्देशाने केला होता शस्त्राचा वापर

मिरज, ता.१: मिरज रेल्वे स्टेशन परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्याने हे शस्त्र सोशल मीडियावर 'रील्स' बनवण्यासाठी आणल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मिरज विभाग) प्रणिल गिल्डा यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने डी.बी. पथकांना पेट्रोलिंगसाठी नेमून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिवपुत्र कुंडगोळे यांना (ता.२४) रोजी गोपनीय माहिती मिळाली की, मिरज रेल्वे स्टेशनजवळ पिंपळाच्या झाडाखाली एक अल्पवयीन मुलगा दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना तलवार घेऊन थांबला आहे. या माहितीच्या आधारावर स.पो.नि. संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने सापळा रचून कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून २०० रुपये किमतीचे एक तलवारसदृश हत्यार जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने "दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी" हे हत्यार बाळगल्याची कबुली दिली.
याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे हे करत आहेत. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसांनी प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई केली आहे.
नागरिकांनी अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन दिसल्यास त्वरित महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.