महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्र तस्करी प्रकरणी अटक; कुस्ती क्षेत्रात खळबळ


मोहाली/चंदीगड, ता.१: महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ गदा पटकावलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करीच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. सिकंदरसह एकूण चार जणांना या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पंजाब पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाबमध्ये ‘पपला गुर्जर’ टोळीला पुरवणार होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे एक्सयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे दिली जाणार होती. त्यानंतर सिकंदरने ही शस्त्रे नयागाव येथील कृष्ण उर्फ हॅप्पी याला पोहोचवण्याचा प्लॅन होता. मात्र, पोलिसांनी वेळेत कारवाई करत एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार उर्फ हॅप्पी यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींकडून पोलिसांनी १ लाख ९९ हजार रुपये रोख, पिस्तुलं, जिवंत काडतुसे, तसेच एक स्कॉर्पिओ-एन आणि एक एक्सयूव्ही अशा दोन आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खरड (पंजाब) पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचा सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ येथील असलेला सिकंदर शेख, कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याने ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला होता. तो बीए पदवीधर असून, आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती झाला होता, मात्र नंतर त्याने नोकरी सोडली.
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर गेल्या पाच महिन्यांपासून मुल्लांपुर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता. तो या शस्त्रपुरवठा प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचा पोलिसांना संशय आहे. इतर तीन आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, पंजाब पोलिसांनी सिकंदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला आहे. या अटकेमुळे कुस्ती विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button