(सांगली प्रतिनिधी)

सांगली, ता.३० : सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सापळा रचून केली कारवाई:पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील आरोपी गणेश अंकुश बंडगर (वय ३१, रा. चिंतामणीनगर, सांगली) हा सांगली बायपासजवळ चोरीची मोटारसायकल कमी किंमतीत विक्री करण्यासाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचला आणि आरोपी गणेश बंडगर याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने चौकशीत तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या या तिन्ही मोटारसायकली जप्त केल्या आहेत, ज्यांची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.