भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव ग्रामीण भागासाठी ठरतोय डोकेदुखी; नसबंदी उपाययोजना राबवण्याची मागणी


– नागरिक जागृती मंचातर्फे सांगली जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर
– जिल्हा परिषद गटात किंवा मोठ्या ग्रामपंचायतींमार्फत उपाययोजना करण्याची विनंती

(सांगली प्रतिनिधी)
सांगली, ता.३१ : सांगली जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागामध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी भटक्या कुत्र्यांना पकडणे आणि त्यांची नसबंदी (Sterilization) करण्याची उपाययोजना जिल्हा परिषदेमार्फत राबवावी, अशी मागणी ‘नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हा’ चे सतीश साखळकर यांनी बुधवारी (ता.२९) रोजी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, सांगली जिल्हा परिषदेचे संपूर्ण कार्यक्षेत्र शंभर टक्के ग्रामीण आहे. पूर्वी ही समस्या प्रामुख्याने शहरे आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये आढळून येत होती, परंतु आता ग्रामीण भागातही या समस्येची तीव्रता वाढली आहे.भटक्या कुत्र्यांच्या नैसर्गिक वाढीमुळे त्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही फास्ट फूडचे गाडे आणि हॉटेल व्यवसाय वाढल्याने कुत्र्यांना खाद्य सहज उपलब्ध होत आहे.
पूर्वी शहरांमधील भटकी कुत्री ग्रामीण भागात सोडून देण्याचे प्रकार होत होते, ज्यामुळे ग्रामीण भागातील संख्या वाढली.

आवश्यक उपाययोजना आणि मागणी:
महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. याच धर्तीवर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
मागणीनुसार आवश्यक उपाययोजना
प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किंवा मोठ्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवावी.
पकडलेल्या कुत्र्यांवर नसबंदीची उपाययोजना तातडीने सुरू करावी.
कुत्र्यांना पकडून नेण्यासाठी आणि ‘डॉग पाउंड’ (Dog Pound) इत्यादी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

या यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेने शासन स्तरावरून प्रयत्न करून निधी उपलब्ध करावा आणि वरील उपाययोजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी आग्रहाची विनंती सतीश साखळकर यांनी केली आहे.


या निवेदनाची प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री मा. नाम. चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. नाम. जयकुमार गोरे, आणि मा. जिल्हाधिकारी सांगली जिल्हा यांनाही पाठवण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button