दारूसाठी पैसे न दिल्याने नवऱ्याकडून पत्नीवर कुऱ्हाडीचा हल्ला; महिला गंभीर जखमी

कुपवाड /प्रतिनिधी


कुपवाड, ता.३०: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त पतीने पत्नीच्या डोळ्यावर,हनवटीवर आणि डाव्या हातावर कुऱ्हाडीने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कुपवाड शिवशक्तीनगर परिसरात घडली आहे. या हल्ल्यात सौ. सुहासिनी यल्लाप्पा डबन्नावर (वय २९, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयित पती यल्लाप्पा सत्याप्पा डबन्नावर (वय ३५) याच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहासिनी डबन्नावर या मिरज एमआयडीसीतील एका रुग्णालयात साफसफाईचे काम करतात, तर त्यांचा पती यल्लाप्पा हा गवंडी काम करतो. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी सुमारे साडे चारच्या  वाजण्याच्या सुमारास सुहासिनी या कामावरून शिवशक्तीनगर येथील घरी जात असताना, मिरज एमआयडीसीतील बिरोबा मंदिरासमोर पतीने त्यांना अडवले. यावेळी दारू पिण्यासाठी यल्लाप्पा याने पत्नीकडे पैशांची मागणी केली. सुहासिनी यांनी "माझ्याकडे पैसे नाहीत" असे म्हणताच, संशयित पतीने हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या हातावर वार केला.या हल्ल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतरही यल्लाप्पा न थांबता त्याने पत्नीच्या  डोळ्यावर आणि हनवुटीवर कुऱ्हाडीने वार केले.या जीवघेण्या हल्ल्यात सुहासिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संशयित पती घटनास्थळावरून पळून गेला. 

नातेवाइकांनी तातडीने जखमी महिलेला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुहासिनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित पती यल्लाप्पा डबन्नावर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे करीत आहेत.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button