
(विशेष प्रतिनिधी)
मुंबई, ता.२९: राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत, ११ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. ही रक्कम येत्या १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या नुकसानीसाठी एकूण ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज आम्ही जाहीर केले होते. यापैकी ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, त्याचा लाभ राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना झाला आहे.”
आजच्या निर्णयामुळे मदतीच्या वितरणाला मोठी गती मिळणार आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “आज ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील १५ दिवसांत बाधित जिल्ह्यांमधील किमान ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.”
ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी केवळ दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळाली होती, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे (शासकीय निकषांनुसार) अर्थसहाय्य देखील दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.