सांगली जिल्ह्यात आधार सेवा होणार गतिमान; २० केंद्रांना मिळाले अद्ययावत ‘किट’

जुन्या, नादुरुस्त साहित्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होणार; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते वाटप

सांगली, ता.२९: सांगली जिल्ह्यातील आधार नोंदणी आणि संबंधित सेवांमध्ये आता मोठी सुधारणा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेले जुने आधार किट (Aadhaar Kits) वारंवार नादुरुस्त होत असल्याने नागरिक आणि चालक दोघांनाही होणारा त्रास आता थांबणार आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत २० आधार सेवा केंद्र चालकांना नवीन, अद्ययावत उपकरणांचे संच वितरित केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या नवीन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, “या नवीन आणि आधुनिक उपकरणांमुळे आधार नोंदणीचे काम अधिक जलद, बिनचूक आणि दर्जेदार होण्यास मदत होईल. नागरिकांना सुलभ सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. या नवीन किटमुळे जिल्ह्यातील आधार सेवांचा दर्जा नक्कीच उंचावेल.”

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा व्यवस्थापक संचित पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

जुन्या किटमुळे होत होता त्रास

मागील दहा वर्षांपासून वापरात असलेली जुनी आधार किट आता बऱ्यापैकी कालबाह्य झाली होती. यातील लॅपटॉप अचानक बंद पडणे, प्रिंटर खराब असणे, आणि विशेषतः फिंगरप्रिंट व आयरिश स्कॅनरमध्ये त्रुटी येणे अशा समस्या नित्याच्या झाल्या होत्या. यामुळे स्कॅनिंगचा दर्जा घसरला होता, कामाला उशीर होत होता आणि नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते.

नवीन संचात १५ अत्याधुनिक वस्तू

या सर्व अडचणींवर उपाय म्हणून जिल्हाधिकारी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी कनिचे यांच्या कार्यवाहीतून हा नवीन संच वाटपाचा निर्णय घेण्यात आला. या एका संचात तब्बल १५ आधुनिक वस्तू आहेत. यामध्ये उच्च क्षमतेचा लॅपटॉप, प्रिंटर, मॉनिटर, नवीन तंत्रज्ञानाचे फिंगरप्रिंट व आयरिश स्कॅनर, वेब कॅमेरा, जीपीएस डिव्हाइस, पांढरा पडदा आणि बल्ब अशा अत्याधुनिक साहित्याचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला सीनियर सपोर्ट इंजिनिअर विपुल मद्वाण्णा, अशोक कोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आधार सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button