२०२७ च्या जनगणनेची घोषणा; पूर्वचाचणी येत्या नोव्हेंबरमध्ये, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

मुंबई:भारत सरकारने २०२७ मध्ये देशाची जनगणना घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या मोठ्या प्रक्रियेची तयारी म्हणून, येत्या १० ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत देशव्यापी पूर्वचाचणी (pre-test) घेतली जाणार आहे. ही पूर्वचाचणी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी होणार आहे. जनगणनेच्या मुख्य कामापूर्वी माहिती संकलनाची प्रक्रिया आणि वापरण्यात येणारी यंत्रणा तपासणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राच्या जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “या पूर्वचाचणीच्या काळात, जनगणनेसाठी नियुक्त केलेले प्रगणक आणि पर्यवेक्षक माहिती गोळा करण्यासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घरोघरी भेटी देतील.”

देशाच्या विकासाच्या नियोजनासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असल्याने, नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना योग्य आणि खरी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे. या पूर्वचाचणीमुळे २०२७ ची मुख्य जनगणना अधिक सुरळीत आणि अचूकपणे पार पाडण्यास मोठी मदत होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button