पलूस येथे सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे शानदार आयोजन

परंपरा जपणाऱ्या बारा बलुतेदार आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान!

पलूस, ता.२८: येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या (Sonai Charitable Trust) स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात आणि शानदार समारंभात साजरे करण्यात आले. या विशेष प्रसंगी ट्रस्टच्या सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ सामाजिक कार्याला सलाम करण्यात आला, तसेच संस्कृती आणि श्रमाचे महत्त्व जपणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना आणि सत्कार सोहळ्यास सांगलीचे खासदार विशाल पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी त्यांनी ट्रस्टच्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याबद्दल अभिमानाचे उद्गार काढले आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या विशेष सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ‘बारा बलुतेदार’ आणि बैलजोडीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. आधुनिक युगातही आपला पारंपरिक व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे जोपासणाऱ्या बारा बलुतेदारांचा तसेच आजही बैलजोडीचा वापर करून शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. परंपरा, कष्ट आणि ग्रामीण संस्कृतीचे मूल्य जपणाऱ्या या सर्वांचा सन्मान करण्याचा ट्रस्टचा हा उपक्रम उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. सोनाई चॅरिटेबल ट्रस्टने गेली २५ वर्षे समाजातील विविध घटकांसाठी नि:स्वार्थ सेवा पुरवत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. पलूस स्मशानभूमीत मोफत दहन साहित्याची सुविधा पुरवणे, शेतकऱ्यांचा सन्मान आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन अशा सेवाभावी कार्यांतून ट्रस्टने आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे.

या कार्यक्रमाला आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्यासह श्री. महेंद्र लाड, श्री. जे. के. जाधव, श्री. वैभव पुदाले, श्री. बाळासाहेब पवार, तसेच लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button