
शहर स्वच्छतेसाठी कठोर पाऊल; सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळा, अन्यथा कडक दंड
सांगली, ता.२८: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने शहर स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून आता कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार सूचना आणि प्रबोधन करूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत, वार्ड क्रमांक ५ मधील किल्ला भागात पाण्याच्या टाकीजवळ उघड्यावर कचरा टाकणाऱ्या काही नागरिकांवर महानगरपालिकेने आज, मंगळवारी (ता. २८) रोजी दंडात्मक कारवाई केली. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेसाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. सदर कारवाई ही स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे, महेश कांबळे, मनोज हरिजन, भाग मुकादम कोरके तसेच सय्यम मॅडम आदी अधिकारी यांनी केली.
——मनपाकडून नागरिकांना आवाहन——
प्रत्येक नागरिकांनी आपला घरगुती ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा करूनच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावा.
कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे पूर्णपणे टाळावे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर, नियमांनुसार, कुठलाही मुलाहिजा न ठेवता कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.