
सांगली, ता.२८ : येथील शामरावनगर परिसरातील स्वराज्य चौकात रविवारी रात्री नऊच्या सुमारास वर्चस्ववादातून दोन गटात मोठा राडा झाला. काठीसह धारदार हत्यारांचा वापर करत १९ वर्षीय दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला वर्मी वार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्य चौकात बाजार भरलेला असतानाच हा प्रकार घडला. वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातून झालेल्या या संघर्षात दोन तरुणांना लक्ष्य करण्यात आले. मारहाण इतकी गंभीर होती की, एका तरुणाच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला, तर दुसऱ्या तरुणाच्या छातीवर वार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मारहाण झालेले तरुण हे धुंद अवस्थेत होते, तसेच त्यातील एक जण पोलिस रेकॉर्डवरील असल्याचे समजते.