३.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली, ता.२७: मिरज येथे अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कठोर आदेशानुसार, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने मिरज शहरात मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. रमा उद्यान कॉलनी येथील ऑक्सिजन पार्क परिसरात सापळा रचून विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोन रेकॉर्डवरील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत ५ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे असा एकूण ३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांची अधिक माहितीनुसार १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले.
या पथकातील सपोफौ अनिल ऐनापुरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मलिक सलीम शेख (वय २५, रा. दत्तनगर, मिरज) आणि त्याचा साथीदार प्रथमेश ऊर्फ पाट्या सुरेश पाटोळे (वय २२, रा. बामणोली, मिरज) हे दोघे ऑक्सिजन पार्क परिसरात अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन सावंत यांच्या पथकाने त्वरित ऑक्सिजन पार्क परिसरात सापळा रचून निगराणी सुरू केली. दोन संशयित इसम चालत येत असताना दिसताच, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपी मलिक शेख याच्या पाठीवरील सॅकमध्ये देशी बनावटीचे ५ गावठी पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे मिळून आली. या शस्त्रास्त्रांबाबत कोणताही कायदेशीर परवाना त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिक चौकशीत आरोपींनी कबूल केले की, त्यांनी ही शस्त्रे विक्रीच्या उद्देशाने मध्यप्रदेशातील (जि. बडवाणी) राजेद्रसिंग ऊर्फ गोलुसिंग टकराना याच्याकडून विकत आणली होती.
मुख्य आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणी पोहेकॉ आमसिद्ध खोत यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपी मलिक शेख आणि प्रथमेश पाटोळे यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा (गु.र.न. ४१४/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळाल्यानंतर मुख्य आरोपी राजेद्रसिंग टकराना याचा शोध घेण्यासाठी पथक मध्यप्रदेशातील त्याच्या गावी गेले होते. मात्र, तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
विशेष म्हणजे, अटक आरोपी मलिक शेख हा सराईत गुन्हेगार असून तो मिरज शहर पोलीस ठाण्याकडील आर्म अॅक्टच्या दोन इतर गुन्ह्यांमध्येही (गु.र.न. २४२/२०२५ आणि ९३/२०२५) पाहिजे होता.
या पुढील अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहे.