
विभूतवाडी, ता.२७: (ता. आटपाडी) राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. जयाभाऊ गोरे यांच्या प्रमुख व जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे भारतीय जनता पक्षाचा भव्य संवाद मेळावा, पक्षप्रवेश सोहळा आणि विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत यावेळी दोन प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी माजी सभापती सौ. कुसूमताई मोटे आणि युवा नेते नारायण खरजे सर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने आटपाडी तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बाजू अधिक बळकट झाली असून, या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या विकासकामांवर आणि धोरणांवर आपला विश्वास व्यक्त केला.

मेळाव्यामध्ये ग्रामविकास मंत्री मा. जयाभाऊ गोरे यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले. “सर्वांनी एकदिलाने, संघटितपणे आणि जिद्दीने काम करून निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित करावा,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
या मेळाव्याला समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर, भाजपा तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, खानापूर तालुका अध्यक्ष दाजी शेठ पवार, माजी सभापती जयवंत सरगर, ओबीसी मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष संग्राम माने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय राजमाने तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाच्या बळकट संघटनेचा आत्मविश्वास आणि ग्रामविकासाची स्पष्ट दिशा कार्यकर्त्यांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणवली.