
मुंबई: देशाच्या सागरी सामर्थ्याला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ चे उद्घाटन आज (ता.२७) रोजी मुंबईतील नेस्को प्रदर्शनी सेंटर, गोरेगाव येथे दिमाखदार सोहळ्यात झाले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
याशिवाय, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकुर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होते. या ‘इंडिया मेरीटाईम वीक’ दरम्यान सागरी क्षेत्रात गुंतवणूक, बंदरांचा विकास, आणि किनारपट्टीवरील सुरक्षा तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या धोरणांवर सखोल चर्चा व विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे.
सागरी क्षेत्राला प्रोत्साहन:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. “मेरीटाईम वीक’ हा भारताला जागतिक सागरी नकाशावर प्रमुख स्थान मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा उपयोग करून मेरीटाईम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमामुळे देशातील सागरी व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.