
मनमा, बहरीन: बहरीनची राजधानी मनामा येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारतीय कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताने कबड्डीमध्ये संपूर्ण वर्चस्व गाजवत अपेक्षेप्रमाणे सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या विजयामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विजयी युवा संघात महाराष्ट्रातील एका गुणी खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे. मुंबईजवळील कांजूरमार्ग येथील कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने मुलींच्या भारतीय कबड्डी संघात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला. सेरेनाची उत्कृष्ट खेळी आणि महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारतीय संघाचा विजय अधिक सोपा झाला. सेरेनाच्या या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे कांजूरमार्गसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
क्रीडामंत्र्यांकडून अभिनंदन
भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल आणि विशेषतः सेरेना म्हसकरच्या योगदानाबद्दल राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे. “सेरेना म्हसकर हिने कांजूरमार्गसारख्या भागातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे उद्गार ॲड. कोकाटे यांनी काढले.
ॲड. कोकाटे यांनी सेरेनासह संपूर्ण भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले असून, भविष्यातही हे खेळाडू देशासाठी असेच यश मिळवत राहतील, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय कबड्डी संघाच्या या विजयाने युवा पिढीला प्रेरणा मिळाली असून, खेळांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.