
सांगली, ता.२५ : जत येथे महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. ‘महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत’ यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला ही परवानगी मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पोलीस निरीक्षक भैराप्पा तळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. पी. मिरजकर, जत नगरपरिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदी सदस्य उपस्थित होते.
स्मृती समितीने जत येथील स.नं. ३०२/२ या जागेत पुतळा बसविण्याची परवानगी मागितली होती. सादर झालेल्या प्रस्तावाची शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार पडताळणी करण्यात आली. मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या अहवालांनुसार संबंधित जागेवर पुतळा बसवण्यास कोणत्याही यंत्रणेची हरकत नसल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर, शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याच्या तसेच पुतळ्याची रचना आणि आकारमान योग्य ठेवण्याच्या अटीवर जत येथील स.नं. ३०२/२ मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
संबंधित समितीने लवकरात लवकर पुतळा बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असेही आदेशात नमूद आहे.