
कुपवाड, ता. २४: जुन्या भांडणाच्या वादातून एका १९ वर्षीय युवकावर अजिंक्यनगर येथे प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात सौरभ करपे (वय १९, परमानंद कॉलनी, कापसे प्लॉट, कुपवाड) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघे संसायिताचे नावे भीमा पुजारी (पागल पान शॉप मागे, कुपवाड), शाहरूख फारूख मकानदार (फकीर मळा, बुधगाव रस्ता, कुपवाड) अशी असून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २१) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सौरभ करपे अजिंक्यनगर येथील एका पान पट्टीसमोर थांबला होता. त्याचवेळी संशयित भीमा पुजारी व शाहरूख मकानदार यांनी संगनमत करून जुन्या भांडणाच्या कारणातून त्याच्यावर हल्ला केला. संशयित भीमा याने सौरभच्या तोंडावर लाथ मारून ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याने शिवीगाळ करत लोखंडी पंचने पोट, छाती व पाठीतही मारहाण केली. या हल्ल्यात संशयित शाहरूखने चाकूचा वापर करत सौरभच्या हातावर व छातीवर वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
जखमी सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच, संशयित आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. नातेवाइकांनी तातडीने धाव घेऊन जखमी करपेला सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी सौरभ करपे याने कुपवाड पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही संशयितांना तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत.