बँकांमधील बेवारस ठेवी खातेदारांना परत करा; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना जनजागृतीचे निर्देश

सांगलीत १७६ कोटींच्या ठेवी पडून; विशेष महामेळाव्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन

आतापर्यंत ३३४ जणांना सुमारे ३९ लाख रुपये परत

सांगली, ता.२४ : सांगली जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये नागरिकांची तब्बल १७६ कोटी रुपयांची रक्कम दावा न केल्यामुळे (Unclaimed) पडून आहे. ही रक्कम मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत मिळवून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी बँकांनी विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करावी आणि खातेदारांपर्यंत पोहोचावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. जिल्हा अग्रणी कार्यालय (बँक ऑफ इंडिया) तर्फे आयोजित ‘बेवारस ठेवी परत’ महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. वसंतदादा पाटील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी व्यासपीठावर बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागाचे उप-आंचलिक प्रबंधक विशालकुमार सिंह, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ, आणि एलआयसी सातारा विभागाच्या व्यवस्थापक संगिता हिंगमिरे उपस्थित होत्या.

“जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ३१५ खातेदारांची ही १७६ कोटींची रक्कम आहे. हा हक्काचा पैसा परत मिळाल्यास अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागेल. बँकांनी व्हॉट्सॲप, एसएमएस अशा आधुनिक माध्यमांचा वापर करून ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी. नागरिकांनीही आवश्यक कागदपत्रांसह आपल्या बँकेशी संपर्क साधावा आणि मिळालेल्या रकमेची योग्य गुंतवणूक करावी.” —-जिल्हाधिकारी अशोक काकडे

रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे, जर बचत, चालू किंवा मुदत ठेव खात्यात सलग १० वर्षे कोणताही व्यवहार झाला नाही, तर ती रक्कम बेवारस मानून आरबीआयकडे जमा केली जाते. मात्र, त्यानंतरही खातेदार किंवा त्यांचे वारस या रकमेवर दावा करू शकतात. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३३४ खातेदारांना शोधून त्यांचे ३८.९९ लाख रुपये परत करण्यात आले आहेत. कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यास ३५० ते ४०० ग्राहक, विविध बँकांचे अधिकारी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांना निष्क्रिय ठेवी, विमा, आणि पेन्शनच्या रकमेवर दावा करण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button