
सांगली, ता.१६: जिल्ह्यात विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशाच्या अटी:
- शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई.
- कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेण्यास मनाई.
- दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई.
- व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई.
- ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पद्धतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारित करण्यास मनाई.
- जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई.
अपवाद:
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही.
हा आदेश १७ ऑक्टोबर २०२५ रोजीचे ००:०१ वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ रोजीचे २३:५९ वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.