
सांगली, ता.१७: महानगरपालिकेतील १० शाखा अभियंते (स्थापत्य) व ३७ अधीक्षकांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसात खुलासा मागवण्यात आला असून समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
कारणे दाखवा नोटीस का?
स्थापत्य विभागातील प्रलंबित विकासकामे, कार्यारंभ आदेशांवरील दिरंगाई, तसेच शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त, मुख्यमंत्री सचिवालय आणि लोकशाही दिनाशी संबंधित प्रकरणांवर अधिकारी-अभियंत्यांकडे कोणतीही माहिती नसल्याचे आढळले होते. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ही उणीव समोर आली होती.
आयुक्तांचे निर्देश
आयुक्त सत्यम गांधी यांनी या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावताना दोन दिवसात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.