
सांगली, ता.१६: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी आणि परिणामकारक आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१४) स्वच्छता विभागाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकी मध्ये निर्णय घेण्यात आले आहेत. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तातडीने भरारी पथके तयार करण्यात येणार आहे. स्वच्छता दूत/NGO चा सहभाग: स्वच्छता विषयक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक प्रभागात “स्वच्छतादूत” किंवा “NGO” यांची नेमणूक केली जाईल. मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेसाठी भूखंड मालकांना नोटीस देऊनही स्वच्छता न झाल्यास, दंड आकारून त्यानंतर मालमत्तेवर बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ई-रिक्षाद्वारे कचरा संकलन: मुख्य बाजारपेठांमधून सकाळ व सायंकाळच्या सत्रात ई-रिक्षाद्वारे कचरा संकलन केले जाणार आहे.

जनजागृती आणि आरोग्य उपाययोजना
प्रत्येक प्रभागातील अपार्टमेंटमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र लहान आकाराचे दोन डस्टबीन ठेवणे बंधनकारक असेल. प्रभागातील शाळांमध्ये पालक बैठका घेऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात येईल, तसेच दर आठवड्याला स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. उघड्यावर कचरा टाकण्याच्या ठिकाणांची सफाई करून, तिथे “कचरा टाकणे सक्त मनाई आहे” असे फलक लावण्यात येणार आहे. डास व इतर संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात दर १५ दिवसांनी औषध फवारणी केली जाईल. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांना भागात अधिक वेळ देऊन जास्तीत जास्त कचरा संकलन केले जाईल.
बैठकीत घेतलेले निर्णय शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती व परिणामकारकता देतील, असा विश्वास –महापालिका आयुक्त सत्यम गांधी
यावेळी अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी, अतुल आठवले तसेच सर्व प्रभागांचे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.