
सांगली, ता.१० : शहरातील नागरिकांचे प्रशंसनीय सहकार्य, प्रशासनाची पारदर्शक वसुली मोहीम यशस्वी. सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये ३० सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत एकूण रु. ५१ कोटींची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. ही वसुली मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवित असून, महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरले आहे. या कालावधीत शहरातील एकूण ६७,७५२ मालमत्ता धारकांनी घरपट्टीचा भरणा केला असून, त्यामध्ये पुढीलप्रमाणे विभागनिहाय वसुली झाली आहे
- सांगली क्षेत्र : ३८,३५२ मिळकतींकडून रु. ३१ कोटी
- मिरज क्षेत्र : १६,११५ मिळकतींकडून रु. ११ कोटी
- कुपवाड क्षेत्र : १३,३२५ मिळकतींकडून रु. ९ कोटी
नियोजनबद्ध व पारदर्शक वसुली प्रणाली ही विक्रमी वसुली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख व उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे कामकाज नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आले.
“ही उल्लेखनीय वसुली ही मालमत्ता कर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून, समन्वयाने व टीम भावनेने केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांनी देखील स्वेच्छेने कर भरण्यात सहभाग घेतल्याने ही यशोगाथा घडली आहे.” ⸻आयुक्त सत्यम गांधी——-
- वसुली वाढीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम
- ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
- एसएमएस व पत्राद्वारे सूचना देऊन नागरिकांना माहिती पुरविण्यात आली.
- प्रोत्साहनपर उपक्रमांद्वारे कर भरण्यास प्रवृत्त करण्यात आले.
- थकबाकीदारांविरुद्ध विशेष जप्ती मोहीम हाती घेण्यात आली.
⸻
थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाई
- जप्तीपूर्व नोटीस वितरण – थकबाकीदारांना कर भरण्यासाठी प्रथम सूचना देणे.
- मालमत्ता जप्ती – नोटीस न पाळल्यास संबंधित मिळकती जप्त करणे.
- लिलाव / विक्री प्रक्रिया – सातत्याने थकबाकी राहिल्यास मालमत्तेचा लिलाव.
- दंड व व्याज आकारणी – ठराविक कालावधी न पाळल्यास अतिरिक्त शुल्क व व्याज आकारणी.
नागरिकांना आवाहन
“थकबाकीदारांविरुद्ध कारवाई सुरू असून, दंडात्मक कार्यवाही टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी तात्काळ आपला कर भरणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून महानगरपालिकेच्या विकासकामात सक्रिय सहभाग नोंदवावा.” सहाय्यक आयुक्त (मालमत्ता कर विभाग) आकाश डोईफोडे