अतिक्रमण करणाऱ्याची गय केली जाणार नाही – आयुक्त सत्यम गांधी

सांगली, ता.११: दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेऊन आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई करत महानगरपालिका प्रशासनाने आज अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम तीव्र केली.
सांगली मारुती रोड ते आरवडे हायस्कूल परिसरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर झालेले अतिक्रमण हटवण्यात आले.
* कारवाई आणि गुन्हा दाखल *
कारवाईदरम्यान, ठोंबरे चिरमुरे स्टोअर दुकानासमोर विनापरवाना आणि निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक जागेवर घालण्यात आलेला मंडप अतिक्रमण विभागाने तत्काळ काढून टाकला. यावेळी काही दुकानदारांनी स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमण काढून प्रशासनास सहकार्य केले. दरम्यान, कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यामुळे, संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालून दमदाटी केल्याबद्दल श्री. ठोंबरे यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*आयुक्तांचा कठोर इशारा*
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, दुकानासमोर केवळ दहा फुटापर्यंतच मंडप घालण्याची परवानगी आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढे कडक दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त (क्षेत्रीय कार्यालय क्र. १) आकाश डोईफोडे, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, उप अभियंता महेश मदने, ऋतुराज यादव क.अभियंता, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, बांधकाम पर्यवेक्षक वादवणे अतिक्रमण अधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त (क्षेत्रीय कार्यालय क्र. २) नागार्जुन मद्रासी, तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली.
महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन: शहरातील वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने काढून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा थेट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल.